मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही राजभाषा आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू व गोवा ह्या राज्यांतील काही भागांत मराठी बोलली जाते. मराठी प्रथम भाषा असणा-यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील सतरावी व भारतातील चौथी भाषा आहे. महाराष्ट्र व गोव्याव्यतिरीक्त मराठी बेळगांव, हुबळी-धारवाड, बिदर, इंदूर, ग्वाल्हेर, बडोदा, हैद्राबाद, तंजावर येथे देखिल बोलली जाते. भारताबाहेर इस्त्राएल व मॉरिशीयस या देशात देखिल मराठी भाषक आहेत. मराठी माणंस युरोप-अमेरिकेसह जगभर पसरली आहेत. मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे.[१] भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३०[संदर्भ द्या] पासून मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला. श्रावणबेळगोळ येथील सर्वात जुना मराठी शिलालेख, प्रताधिकार-कामत.कॉम सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य-काळातील ताम्रपट्टीवर आहे (इ. स. ७३९) येथे आहे. श्रावणबेळगोळ, कर्नाटक येथे सर्वात प्राचीन मराठी शिलालेख आहे. हा शिलालेखात राजा गंगराया व त्याचा सेनापती चामुंडराया यांचे उल्लेख आहेत.